Maharashtra Assembly Elections: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारेंवर कारवाई करा: रोहन सुरवसे-पाटील
पुणे: पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘एअर बलून’ लावून आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी शिवतारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना कारवाईच्या मागणीचे निवेदन सुरवसे-पाटील यांनी दिली. याप्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय सागर, सागर घाडगे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते.
फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने बॅनर अथवा होर्डिंग लावण्यास राजकीय पक्षांना व उमेदवारांना प्रतिबंध आहे.
विजय शिवतारे यांनी लावलेल्या एअर बलूनचे व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्याचेही सुरवसे-पाटील यांनी सांगितले.