Maharashtra Assembly Elections: काँग्रेसच्या गॅरंटींची अंमलबजावणी पाहण्यासाठी भाजपा नेत्यांनी कर्नाटकात यावे; विशेष विमान व बसेसची सोय करु: डी. के. शिवकुमार
मुंबई, दि. ९ नोव्हेंबर २०२४: काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उघडा करून भाजपाला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे, याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली.
टिळक भवनातील ऐतिहासिक पत्रकार परिषदेत बोलताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी भाजपाचा खोटेपणा उघड करताना सांगितले की, सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो. महाराष्ट्रा प्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली. काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जूनी पेन्शन योजना लागू केली. ज्यांना ५००० रुपये मिळत होते त्यांना आता ५० हजार रुपये मिळत आहेत. मक्याला प्रतिकिलो ३० रुपये, गहू ४० रुपये किलो तर गाईच्या दूधाला प्रति लिटर ४५ तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. ५८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. १८ वर्षांवरील मुलींना १५०० रुपये तर वैद्यकीय शिक्षण, पीएचडी करणाऱ्या मुलींनाही आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगत या गॅरंटींची पूर्तता करण्यासाठी महसूल उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत, असे सुख्खू यांनी सांगितले.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी यांनी स्वतंत्र तेलंगणाचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीच्य वेळी ६ गॅरंटी जाहिर केल्या होत्या. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांची कर्जमाफी दिली, याचा फायदा २२ लाख शेतकऱ्यांना झाला असून यासाठी बळीराजाला १८ कोटी रुपये वितरीत केले. १० महिन्यात ५० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. महालक्ष्मी योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरु केला असून आतापर्यंत बस महामंडळाला ३४०० कोटी रुपये दिले आहेत. ५९ लाख कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर दिले जात आहे. गृहज्योती योजनेअंतर्गत ५० लाख कुटुंबांना २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे. महालक्ष्मी योजनेसाठी दरवर्षी ४ हजार कोटी असे पाच वर्षांसाठी २० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून त्याची तरतूद केली आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरु केली जाणार आहे, असे रेवंत रेड्डी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात कर्जमाफी दिली नाही असे ट्विट केले होते पण मी त्यांना कर्जमाफीचा अहवाल पाठवल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. भाजपाकडे सांगण्यासारखे काहीही नाही म्हणून ते काँग्रेस विरोधात जनतेची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्र म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आठवतात पण या महान शक्तीशाली महाराष्ट्राला भाजपच्या शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा भाजपाच्या हातात देऊ नका, असे आवाहन रेवंत रेड्डी यांनी केले.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकात २२ दिवसांचा पदयात्रा केली, यावेळी जनतेला भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यातूनच कर्नाटकात ६ गॅरंटी देण्यात आल्या. काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी सुरु केली. कर्नाटकातील १ कोटी २२ लाख महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १ कोटी ६४ लाख कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. ४.०८ कोटी लोकांना ‘अन्नभाग्या’ योजनेअंतर्गत १० किलो मोफत तांदूळ दिले जात आहेत. ‘शक्ती’ योजनेतून आतापर्यंत ३२० कोटी महिलांनी मोफत बस प्रवास केला आहे. ‘युवा निधी’ योजनेद्वारे ५ लाख विद्यार्थ्यांना महिन्याला ३००० रुपये मिळत आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर ६० दिवसात या सर्व गॅरंटी लागू केल्या असून यासाठी ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. कर्नाटकाचे बजेट ३ लाख ६५ हजार कोटींचे असून देशातील अनेक भाजप शासित राज्यांपेक्षा कर्नाटकचा अर्थव्यवस्था उत्तम आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विशेष विमान व बससेची व्यवस्था करतो त्यांनी कर्नाटकात येऊन ३३ जिल्ह्यांचा प्रवास करून जनतेला या गॅरंटीबद्दल विचारून खात्री करुन घ्यावी, असे खुले आव्हान डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुठभर अरबपतींचे १२ लाख कोटी रुपये माफ करू शकतात तर काँग्रेस सरकारने गरिबांचे पैसे गरिबांनाच दिले तर भाजपाची पोटदुखी का होते? असा प्रतिसवाल यावेळी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी सादरीकरण करून काँग्रेस सरकारांनी दिलेल्या गॅरंटीची अंमलजाबणी केली आहे व किती लोकांना त्यांचा लाभ झाला आहे याची माहिती पत्रकारांना दिली.
या पत्रकार परिषदेला महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, यु. बी. व्यंकटेश, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रवक्ते चरणजित सप्रा आदी उपस्थित होते.