महापेक्स 2025 – उत्सव टपाल तिकिटांचा
चला तर! तिकिटे गोळा करूया, साजरा करूया उत्सव सांस्कृतिक वारशाचा !
मुंबई, डिसेंबर 7, 2024: महापेक्स 2025 हे महाराष्ट्र राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन आगामी 22 ते 25 जानेवारी 2025 दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे होणार आहे. हा अत्यंत बहुप्रतिक्षित असा कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्याच्या टपाल तिकिटे आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा भव्य उत्सव साजरा करण्यासाठी आयोजिण्यात आला आहे.
महापेक्स 2025 च्या बोधचिन्हाचे अनावरण गेमपेक्स ठाणे 2024 च्या समारोप समारंभात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल, अमिताभ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. बोधचिन्हाची रूपरेषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित आहे. यात वारली चित्रकला आणि महाराष्ट्र व गोव्याचा स्थापत्य वारसा दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ हा महापेक्स 2025 चा शुभंकर आहे
सांस्कृतिक महत्त्व असलेल्या विविध प्रकारच्या टपाल टिकीटांचा, पत्राचारचा इतिहास हा महापेक्स 2025 मध्ये 500-फ्रेमस् (कलाकृतींचे) च्या प्रदर्शनच्या माध्यामातून मांडण्यात येईल. प्रदर्शनाची माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये प्रदर्शनाचे विविध वर्ग, सहभागासाठी पात्रता आणि इतर तपशील देण्यात आला आहे. महापेक्स 2025, राज्यभरातील फिलाटेलिस्ट, संग्राहक आणि उत्साही नागरिकांना एकत्र येण्याची संधी पुरवेल.
यासाठी एक समर्पित संकेतस्थळ, www.mahapex2025.com सुरू करण्यात आले आहे, जे प्रदर्शकांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी एक सोपे साधन प्रदान करते. प्रदर्शनादरम्यान होणाऱ्या विविध चर्चासत्र आणि कार्यशाळांचे तपशीलही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.