Today: Last Update:

add

ईशान्य भारत ते लडाख - कथाबाह्य चित्रपटांनी इफ्फी 2024 चे वेधले लक्ष

Posted by Admin3

?????? ???? ?? ???? - ???????? ??????????? ????? 2024 ?? ????? ????

माहितीपटांसाठी जागृती, मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळाची गरज कथाबाह्य चित्रपटांच्या परीक्षक मंडळाकडून व्यक्त
ईशान्येतील कथाबाह्य चित्रपटांना वित्त पुरवठा करण्याच्या एन एफ डी सी च्या नवीन प्रयत्नांचे परीक्षक मंडळाकडून कौतुक
प्रसारमाध्यमे आणि फिल्म क्लब्समध्ये माहितीपट आणि कथा बाह्य चित्रपटांवर अधिक बोलले गेले पाहिजे - वंदना कोहली"

Mumbai: कथाबाह्य चित्रपटांच्या श्रेणीसाठी देशभरातून 250 पेक्षा अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आणि त्यामध्ये ईशान्य भारतातील सहभागींची संख्या लक्षणीय होती." असे निरीक्षण इंडियन पॅनोरमा विभागाच्या कथाबाह्य चित्रपट श्रेणीच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष सुब्बिया नल्लामुथू यांनी नोंदवले. ते आज गोव्यात 55 व्या इफ्फीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. "यामध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित चित्रपट निर्मात्यांनी भाग घेतला असून यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा सहभाग मोठा आहे. निवडीसाठी मुख्यत्वे आशय आणि कथन या पैलूंना प्राधान्य देण्यात आले", असेही त्यांनी सांगितले.

"या श्रेणीच्या उद्घाटनासाठी एका लडाखी चित्रपटाची निवड ही अतिशय दुर्मिळ, अभिमानास्पद आणि उत्साहवर्धक गोष्ट आहे", अशी भावना परीक्षक मंडळाच्या सदस्य शालिनी शाह यांनी व्यक्त केली. हरियाणवी सिनेमामधील प्रगती बद्दल समाधान व्यक्त करत, समर्पित मार्गदर्शनामुळे तेथील कलेत ही प्रगती घडून आली आहे, असे त्या म्हणाल्या.

कथाबाह्य चित्रपटांना प्रकाशझोतात आणण्याची तातडीची गरज आहे यावर परीक्षक मंडळाने भर दिला. "आपण प्रसार माध्यमांमध्ये या चित्रपटांबद्दल अधिक बोलले पाहिजे आणि प्रेक्षकांमध्ये तसेच चित्रनिर्मात्यांमध्ये याबद्दल जागृती आणण्यासाठी फिल्म क्लब्स (चित्रपट समूह) निर्माण केले पाहिजेत", अशी अपेक्षा वंदना कोहली यांनी व्यक्त केली.

क्षितिजावर उगवणाऱ्या नव्या प्रघातांविषयी विचार करताना परीक्षक मंडळाने, 'ईशान्य भारतातून येणाऱ्या सहभागींच्या संख्येतील वाढ आश्वासक आहे', असे मत नोंदवले. परिणामकारक माहितीपट तयार करण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशात जाणाऱ्या शहरी चित्रपट निर्मात्यांचा प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. यावर्षी निवड झालेल्या अनेक चित्रपटांमधून अशा अभ्यासाचा कल दिसून आल्याचे त्यांनी नोंदवले.

माहितीपटांच्या निर्मितीसाठी अधिक पाठबळाची गरज परीक्षा मंडळाने एकमुखाने व्यक्त केली. अशा माहितीपटांसाठी सुयोग्य मंच उपलब्ध नसल्याने त्यांना मोठी भरारी घेता येत नाही, असा विचार त्यांनी मांडला. कथाबाह्य चित्रपटांच्या प्रकाशन आणि प्रसिद्धीसाठी ओटीटी मंचांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

एखाद्या व्यक्तीने स्वबळावर हाती घेतलेल्या कथाबाह्य चित्रपटाच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार, सी एस आर म्हणजे उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून उभ्या राहणाऱ्या निधीचा विचार करू शकते- असा उपायही त्यांनी सुचवला. एन एफ डी सी म्हणजे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने नजीकच्या भूतकाळात ईशान्येतील कथाबाह्य चित्रपटांना वित्तपुरवठा करण्याचा जो उपक्रम हाती घेतला त्याचे व डॉक्युमेंटरी रिसोर्स इनिशिएटिव्ह उपक्रमाचे परीक्षक मंडळाने स्वागत केले.

इफ्फी 2024 मधील कथाबाह्य चित्रपटांच्या ज्यूरीचे अध्यक्षपद सुब्बैया नल्लमुथू भूषवत आहेत. सुब्बैया नल्लमुथू हे माहितीपट चित्रपटांचे निर्माते म्हणून प्रसिद्ध असून, एफटीआयआयचे माजी विद्यार्थी देखील आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. यामध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

इफ्फी 2024 साठी 'कथाबाह्य चित्रपटांच्या ज्यूरी'मधील सदस्य हे विविध चित्रपट संस्था आणि व्यवसायांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची स्वतंत्र कामगिरी प्रशंसनीय असून, ते भारतीय चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण परंपरेचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे:

1. सुब्बैया नल्लमुथू (अध्यक्ष)

2. रजनीकांत आचार्य, निर्माता व चित्रपट दिग्दर्शक

3. रोनल हाओबम, चित्रपट दिग्दर्शक

4. उषा देशपांडे, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका

5. वंदना कोहली, चित्रपट दिग्दर्शिका व लेखिका

6. मिथुनचंद्र चौधरी, चित्रपट दिग्दर्शक

7. शालिनी शाह, चित्रपट दिग्दर्शिका

पत्रकार परिषदेचा समारोप करताना, वंदना कोहली म्हणाल्या, "आपल्याला माहितीपट समजून घेण्याची, तसेच अशा चित्रपटांचा अभ्यास आणि सन्मान करण्याची गरज आहे." या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सय्यद रबीहाश्मी यांनी केले.

इफ्फी 2024 मध्ये, 262 चित्रपटांमधून निवडलेले 20 कथाबाह्य चित्रपट 'इंडियन पॅनोरमा' विभागात प्रदर्शित होणार आहेत .

या चित्रपटांनी उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांची कुवत, त्यांच्या चौकस दृष्टिकोनासह, मनोरंजनाच्या आणि समकालीन भारतीय मूल्यांच्या प्रतिबिंबाची क्षमता दाखवली आहे. ज्युरींनी कथाबाह्य चित्रपट श्रेणीतील शुभारंभाचा चित्रपट म्हणून ‘घर जैसा कुछ (लडाखी)’ याची निवड केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्ष संगानी यांनी केले आहे.

55 वा इफ्फी 2024 हा जागतिक चित्रपट समुदायासाठी संवाद, नवोन्मेष आणि सहकार्याचा एक महत्त्वाचा मंच म्हणून कार्य करत राहील.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2067711

Whatsapp Join