आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा स्वीकारला कार्यभार
मुंबई/नागपूर, 17 डिसेंबर 2024: दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सात प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. या अंतर्गत 6 राज्यांचा समावेश आहे. मंगळवार, 17 डिसेंबर 2024 रोजी आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन आस्था गोडबोले कार्लेकर यांचे स्वागत केले.यावेळी आस्था गोडबोले कार्लेकर यांनी केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबोधित केले.
आस्था गोडबोले कार्लेकर या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि नाट्य कलाकार आहेत. त्यांनी त्यांची आई आणि लखनौ घराण्याच्या प्रसिद्ध नृत्यांगना सविता गोडबोले यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी स्कूल ऑफ ड्रामा, कला अकादमी, गोवा येथून थिएटर आर्ट्समध्ये डिप्लोमा, देवी अहिल्या विद्यापीठातून संस्कृत साहित्यात एम.ए आणि राजा मानसिंग तोमर विद्यापीठ, ग्वाल्हेर मधून कथ्थकमध्ये एम.ए केले आहे.
आस्था गोडबोले कार्लेकर यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र (CCRT), कडून 10 वर्षांसाठी कनिष्ठ शिष्यवृत्ती, तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून थिएटर आर्ट्समध्ये 2 वर्षांची आणि कथ्थक नृत्यासाठी 2 वर्षांची वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून कथ्थकसाठी 2 वर्षांची ज्युनियर फेलोशिप मिळाली आहे. हिंदी, मराठी, कोकणी, मालवी आणि संस्कृत या भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी, फ्रेंच आणि रशियन भाषेचेही त्यांना ज्ञान आहे.
आस्था गोडबोले कार्लेकर भारतीय संस्कृती केंद्र, ताश्कंद, भारतीय दूतावास, उझबेकिस्तान येथे कार्यरत होत्या. तसेच त्या लयशाला ललित कला फाऊंडेशनच्या संचालिका देखील आहेत.आस्था गोडबोले कार्लेकर या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पॅनेलमधील कलाकार आणि दूरदर्शन मान्यताप्राप्त श्रेणीतील कलाकार देखील आहेत.
त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आणि सोहळ्यांमध्ये आपली कला सादर केली आहे तसेच प्रशिक्षणही दिले आहे. त्यांनी अनेक नाटके आणि नृत्यनाटिकांचे दिग्दर्शनही केले आहे.